घर खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :-
1) जागा मालकाचे नाव, 7/12 उतारा, त्यातील मालकाचे नाव/ नावे, इतर हक्कांबाबत माहिती उदा. बिन कब्जेदार मालक, बॅंक बोजा, गहाणवट, इत्यादीबाबतचे फेरफार तपासून पाहावेत.
2) जागा एन.ए. (बिगर शेती परवाना) आहे की शेतजमीन आहे हे तपासावे.
3) जागा कोणत्या झोनमध्ये येते? ग्रीन झोन, निवासी झोन, रेड झोन, हिलटॉप झोन, गावठाण आहे ते तपासावे. जागा जिल्ह्याधिकाऱ्यांकडून टाऊन प्लॅनिंगकडून एन. ए. झालेली असावी व ती शक्यतो निवासी झोनमधील असावी. (झोन सर्टिफिकेट).
4) जागा ही लीज (भाडे करार) वर आहे की मालकीची आहे, लीजवर असल्यास किती वर्षांचे लीज आहे, त्याची वार्षिक रक्कम किती आहे? हे जाणून घ्यावे.
5) जागा विकसक कोणत्या अधिकारामध्ये विकसित करीत आहे? संबंधित जागेचे मालकाबरोबर"डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट' झाले आहे का त्याची प्रत, त्याचे स्वरूप, जागा "डेव्हलप' केल्यानंतर बिल्डरला प्लॉट/ फ्लॅट विकण्याचे अधिकार आहेत का?
6) जागेवर महापालिकेकडून अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आरक्षण करण्यात आले आहे का? "डेव्हलपमेंट प्लॅन'मध्ये सदर जागा कशासाठी राखून ठेवली आहे का? तसेच सदर जागेवर घर/ इमारत बांधू शकतो का?
7) जमीन सोसायटीची मालकीची असल्यास सोसायटीच्या अटी व शर्ती, सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे का? मूळ सभासदाने सोसायटीकडे रीतसर परवानगी मागितली आहे का? तसेचसोसायटीने त्याप्रमाणे ठराव करून संमती दिली आहे का? सोसायटीचे ट्रान्सफर फीचे पैसे भरलेत का?
9) जागा सरकारी मालकीची असल्यास सरकारकडून/ महामंडळाकडून (म्हाडा, सिडको, हडको, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून इत्यादी) तसे लेखी करार झाले आहेत का? त्याची सत्य प्रत, संबंधित कराराप्रमाणे कोणते अधिकार व योग्य त्या अधिकाऱ्याने असे करार केले आहेत का? असे करार करण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्यास आहे का? या सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्यावी.
10) शासकीय आरक्षणातील जमीन विकसित करावयाची असल्यास काही प्रमाणात घरे/ फ्लॅट हे राखून ठेवावे लागतात व सरकारी आदेशाप्रमाणे ते विकावयाचे असतात.
11) जमिनीच्या 7/12 उताऱ्यामध्ये मालक म्हणून ज्यांची नावे आहेत ती सर्व माणसे हयात हवीत व त्या सर्वांनी "डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट/ पॉवर ऑफऍटर्नी' बिल्डरच्या नावे अथवा विकसकाच्या नावे रजिस्टर केलेली असावी. ती नोटराईज केलेली नसावी.किती पैसे देणे (विकसकाकडून) बाकी आहे?
12) जमिनीचा एन.ए. टॅक्स भरला आहे का?
13) बिल्डरने जमीन विकसित करण्यासाठी महापालिकेकडे विकसनासाठी पैसे भरले आहेत का? जमीन सोसायटीची, महामंडळाची असल्यास संबंधितांकडे "डेव्हलपमेंट चार्जेस' अथवा इतर कर भरले आहेत का?
14) विकसकाची बाजारातील पत, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची ऐपत इत्यादी गोष्टी तपासाव्यात.
15)इमारतीचा नकाशा तसेच संपूर्ण प्रोजेक्टचा लेआउट हा नगरपालिका, महानगरपालिका अथवा कलेक्टरकडून मंजूर झाला आहे का? त्याची प्रत बिल्डरने आपणास दिली आहे का?
16) फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा "सर्च रिपोर्ट', "डेव्हलपमेंट ऍग्रीमेंटची प्रत', मंजूर नकाशा, "कमेन्समेंट सर्टिफिकेट', "एन.ए. ऑर्डर', सर्व टॅक्स भरलेल्या पावत्यांच्या प्रती, "जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी' (सर्व जमीन मालकांची संमती असलेली), 7/12 म्हणजेच जमिनीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड, झोन सर्टिफिकेट, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र (सोसायटीच्या नावावर जमीन असल्यास) लीज डीडची प्रत इत्यादी कागदपत्रांची मागणी करावी व सर्व कागदपत्रे तज्ज्ञ जाणकारांकडून तपासून घ्यावीत.
17) संपूर्ण ले-आउट मंजूर केलेला आहे का? मंजूर नकाशामध्ये आपण घेणाऱ्या फ्लॅटचा समावेश आहे काहे पण पाहावे. तसेच सदर फ्लॅट दोन हिश्श्यांमध्ये विभागलेला नसावा. विभागून फ्लॅट घेतला म्हणजे पाच रूमचा फ्लॅट दोन व तीन रूममध्ये विभागून विकला तर तो अनधिकृत होतो व नगरपालिका त्यावर हरकत घेऊ शकते. वित्तीय संस्था त्यास कर्ज देत नाहीत.
18)नकाशा हा कॉर्पोरेशन, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झालेला असावा. ग्रामपंचायतीस असा नकाशा मंजूर करण्याचा अधिकार नाही. किती मजले बांधायची परवानगी दिली आहे ते पण तपासावे.
19)फ्लॅट घेताना सदर इमारतीचे आर्किटेक्टचे नाव, पत्ता, फोन नंबर तसेच आरसीसी डिझाइनरची, जमीन मालकाची, बिल्डरच्या सर्व पार्टनर्सची नावे, पत्ते, फोन नंबर इत्यादी माहिती करून घेणे.बांधकामाचे साहित्य विकसक कोणाकडून घेत आहे. बिल्डरने कोणते ठेकेदार नेमले आहेत, इलक्ट्रिकलकॉन्ट्रक्टर, प्लंबिंग कॉन्ट्रक्टर यांची नावे.
20)जिथे फ्लॅट घ्यावयाचा आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात काय दर आहेत, याची आधी चौकशी करावी. सदर भागात किती चटई निर्देशांक आहे(एफएसआय) ते तपासावे.
21)इलक्ट्रिकल ले-आउट, स्वीचेस, वायरिंग, साहित्य याची पूर्ण माहिती व ले-आउटची प्रत.
22) प्लंबिंग ले-आउटची प्रत, कोणते पाईप्स वापरणार आहे? त्यात "ए' क्लास, "बी' क्लास, "सी' क्लास, असे वेगवेगळे प्रकार असतात व त्याप्रमाणे त्यांचे दर असतात. प्लंबिंगचे इतर साहित्य उदाहरणार्थ नळ, मिक्सर, शॉवर, गिझर्स इत्यादी माहिती घ्यावी. त्यांचे बाजारातील दर तपासावेत.
23) फ्लॅटमध्ये कोणती फरशी (फ्लोअरिंग) बसवणार आहे त्याची माहिती घ्यावी. जर सिमेंट टाईल्स असतील, तर त्यास पॉलिशिंग लागते. सिरॅमिक टाईल्सअसतील तर त्याची जाडी किती आहे ते माहीत करून घ्यावे. तसेच त्याचा आकार, रंग व कोणत्या कंपनीच्या आहेत ते माहीत करून घ्यावे. जर ग्रॅनाईट किंवा मार्बल फ्लोअर असेल तर मिरर पॉलिशिंग करावे लागते.
24)फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी प्लॅनचा, सेक्शनल व्ह्यू पाहून फ्लॅटची उंची किती आहे ते तपासावे,उंची कमीतकमी 9'6'' असावी व सदर उंची फ्लोअरिंग ते सीलिंग 9'6'' असावी. काही विकसक खालील फ्लॅटचे फ्लोअरिंग ते वरील फ्लॅटचे फ्लोअरिंग यामधील उंची देतात. त्यात स्लॅब व वरील फ्लॅटचे फ्लोअरिंगची जाडी पण मोजणीसाठी पकडली जाते तेव्हा त्याप्रमाणे ती उंची 10'0'' असावी.
25)नकाशामध्ये घराला किती खिडक्या व दरवाजे आहेत हे तपासून पाहावे. खिडक्या नक्की त्या भिंतीमध्ये कोठे आहेत ते पाहावे म्हणजे त्याप्रमाणे आपणास फर्निचर डिझाइन करता येते. तसेच बेडरूम पश्चिमेला असावी व त्याची खिडकी देखील पश्चिमेलाच असावी. त्यामुळे घरात हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश किचनमध्ये रोज कमीतकमी एक तास तरी यावा. त्यामुळे घरात आरोग्य चांगले राहते. किचन हॉलला लागून असावी. त्यामुळेयेणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवता येते.
26)नकाशामध्ये जमिनीवरील पाण्याची टाकी, तिची क्षमता तसेच वर पाणी नेण्यासाठी किती इंची पाइपलाइन टाकली आहे याची पाहणी करावी. तसेच कितीक्षमतेची मोटार पाणी वर नेण्यासाठी वापरली आहे, कोणत्या कंपनीची मोटार घेतली आहे, तिचे वॉटरहेड किती आहे या गोष्टींची माहिती करून घ्यावी.
27)कॉर्पोरेशन अथवा लोकल बॉडीकडून किती इंची व्यासाची पाइपलाइन घेणार आहे हे माहीत करून घ्यावे.
28)इमारतीचे बांधकाम करण्यासाठी कॉर्पोरेशन अथवा स्थानिक मंडळाने "कमेन्समेंट सर्टिफिकेट' कधी दिले आहे म्हणजे बांधकाम सुरू करण्यास परवानगी कधी दिली आहे व किती दिवसांत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, याची खात्री करून घ्यावी.
29) इमारतीत जाणे-येणेसाठी "अप्रोच रोड' आहे का?नसल्यास विकसक काय करणार व रस्ता करण्यासाठी ती जमीन विकसकाने विकत घेतली आहे का? तो रस्ता कोणत्या प्रकारचा करणार? डांबरी, सिमेंट, कॉंक्रीट तसेच त्या रस्त्याचा क्रॉस सेक्शन की ज्यायोगे किती जाडीचे आणि कोणते साहित्य (थर) उदा. खडी, डांबर इत्यादी वापरणार आहे, त्याची माहिती करून घ्यावी.
30)ड्रेनेज लाइन जमिनीखाली करणार आहे त्याला किती इंची पाइपलाइन टाकणार आहे, त्याचा उतार किती ठेवणार व "सेप्टिक टॅंक' बांधणार की कॉर्पोरेशनच्या ड्रेनेज लाइनला जोडणार याची माहिती घ्यावी. "सेप्टिक टॅंक' असेल तर "सेप्टिक टॅंक' व जमिनीतील पाण्याची टाकी यामध्ये कमीतकमी 52' अंतर असावे अशी तरतूद डेव्हलपमेंट कंट्रोल रूलमध्ये केलेली असते. कारण "सेप्टिक टॅंक' व पाण्याची टाकी यात कमी अंतर असेल तर घाण पाणी झिरपून पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. मोठा प्रकल्प असल्यास ड्रेन वॉटर फिल्टरेशन प्लॅंट, रिसायकलिंग प्लॅंट, सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा मासिक देखभाल खर्च किती येतो आहे, त्याची क्षेत्रफळ क्षमता, त्याला लागणारे इलक्ट्रिकल मीटर, कोणत्या कंपनीचा प्लॅंट उभा करणार इत्यादी सर्व माहिती विचारून घ्यावी.
31) विकसक काय काय सुविधा देणार आहे याची सूची मागावी व त्याप्रमाणे सर्व सुविधांची खातरजमा करावी.
32) रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी माहिती घ्यावी.
33) प्रत्येक महिन्यास मेंटेनन्स किती द्यावा लागणार आहे त्याची माहिती घ्यावी.
No comments